Home मराठी बातम्या इतर नवी मुंबईच्या स्वच्छता कामांचा मुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय कार्यशाळेत विशेष उल्लेख

नवी मुंबईच्या स्वच्छता कामांचा मुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय कार्यशाळेत विशेष उल्लेख

नवी मुंबईच्या स्वच्छता कामांचा मुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय कार्यशाळेत विशेष उल्लेख

नवी मुंबई, 25 मे (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नमस्ते (National Action for Macanized Sanitation EcoSystem) या कार्यशाळेप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका सफाई मित्रांच्या कामातील सुरक्षेविषयी घेत असलेल्या काळजीबद्दल प्रशंसा केली.

भारताच्या स्वच्छता परिसंस्थेत यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन कामाच्या परिस्थितीत सुधारणा घडवत स्वच्छता कामगारांचे कल्याण नजरेसमोर ठेवून मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कायदा, 2013 ची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नमस्ते हा राष्ट्रीय उपक्रम घोषित करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाईमित्र कार्यपध्दतीची माहिती देणारी लघुचित्रफितही प्रदर्शित करण्यात आली. ज्याचा विशेष उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात केला व नवी मुंबई महानगरपालिका ज्या फुलप्रुफ पध्दतीने सफाईमित्रांच्या सुरक्षेची काळजी घेते तशा प्रकारची अंमलबजावणी सर्वांकडून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यशाळेमध्ये नवी मुंबईसह पुणे, ठाणे व नागपूर महानगरपालिकांमार्फत मॅनहोल ते मशीनहोल पध्दतीनुसार मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टीक टॅंक यांच्या स्वच्छतेबाबत यांत्रिकी पध्दतीने अंगिकारल्या जाणा-या बेस्ट प्रॅक्टीसेसचे सादरीकरण करण्यात आले.

यामध्ये नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिकाच्या वतीने होत असलेल्या कार्यवाहीची माहिती देताना शहरात केवळ 42 सेप्टीक टँक असल्याचे सांगत इतक्या कमी संख्येने सेप्टीक टँक असणारे नवी मुंबई हे देशातील एकमेव शहर असेल असे सांगितले. आगामी 1 वर्षाच्या कालावधीत हे 42 सेप्टीक टँक बंद करून 100 टक्के सीव्हेज नेटवर्कचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून सेप्टीक टँक फ्री सिटी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे सफाईमित्र करीत असलेल्या कामाचे प्रशिक्षण देणारा सर्टिफिकेट कोर्स सुरु करता येईल काय? याविषयी देखील प्रयत्न सुरु असल्याचे मत आयुक्तांनी सादरीकरण करताना व्यक्त केले.

स्वच्छतेमध्ये राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा नियमित बहुमान मिळविणा-या नवी मुंबईच्या स्वच्छता कार्याविषयी राज्यस्तरीय नमस्ते कार्यशाळेत मुख्यमंत्री महोदयांसमोर नवी मुंबईच्या लघुचित्रफितीचे प्रसारण होणे तसेच मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मनोगतात नवी मुंबईचा विशेष उल्लेख करणे ही बाब नवी मुंबईच्या स्वच्छता कामाची पोचपावती देणारी आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.