Home मराठी बातम्या इतर कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

कांदळवन जतन आणि लागवड अतिशय आवश्यक – उदय सामंत

रत्नागिरी, 5 जून, (हिं. स.) : जागतिक तापमान वाढीचा आणि वाढत्या प्रदूषणाचा विचार करता कांदळवनांचे जतन आणि लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

आरे (ता. रत्नागिरी) येथे राज्य शासनाचा वन विभाग आणि कांदळवन कक्षाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कांदळवन रोपवन लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे. किंबहुना प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्यच आहे. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, कांदळवन हे इतर यंत्रणेपेक्षा सहापट कार्बनडाय ऑक्साइड वायू शोषून घेऊन तेवढ्याच पटीने ऑक्सिजन बाहेर टाकते. कोविडसारख्या रोगांवरही कांदळवन लागवड व जतन करून प्रतिबंध करता येऊ शकतो. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कांदळवनाची संकल्पना समजली पाहिजे. कांदळवन लागवड आणि विकसित का करतो आहोत, हे विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिकांना कांदळवन लागवडीमध्ये पुढाकार कशा पद्धतीने घेईल, यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा अशा सूचना करुन ते म्हणाले, रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण कटिबद्ध असून मुलांमध्ये विज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, या हेतूने रत्नागिरीत तारांगण उभे करण्यात आले. कोकणातील पहिले प्राणिसंग्रहालय मालगुंड येथे ५० एकर जागेवर होत आहे. बर्ड पार्क, स्नेक पार्क, साऊथ आफ्रिकेशी अथवा जयपूरशी टायअप करून पांढऱ्या रंगाचा पटेरी वाघ आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नक्कीच पर्यटक वाढतील आणि ते वाढल्याने येथील रोजगार वाढेल. सिंधुरत्न योजनेतून यासाठी ७५ कोटीचा निधी देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुढील जागतिक पर्यावरण दिनी प्राणिसंग्रहालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

विभागीय वन अधिकारी दिपीक खाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी रत्नागिरीचे प्रांतधिकारी विकास सूर्यवंशी, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, आरे-काळबादेवी सरपंच तृप्ती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कांदळवन रोप लागवडीपूर्वी पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली आणि प्रलंबित कामे ही उत्तम गुणवत्तेची आणि वेळवर पूर्ण करावी. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.