मुंबई, 23 मे (हिं.स.) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेंदूशी संबंधित व्याधी (ब्रेन ट्युमर) असून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. मनोहर जोशी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आणि कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांना जोशी सर असंही संबोधले जाते. ते ८६ वर्षांचे आहेत. शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचे सरकार जेव्हा १९९५ मध्ये आले तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी विविध पदे भूषवली आहेत.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply