नवी दिल्ली, 10 मे (हिं.स.) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणी उद्या, गुरुवारी 11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात विचाराधिन आहे. याप्रकरणी गुरुवारी सकाळच्या सत्रात निकाल लागू शकतो असे संकेत खुद्द सरन्यायमूर्तींनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाह कायद्याप्रकरणी सुनावणी सुरू होती. यावेळी सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावण्यांसदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, “उद्या दोन घटनापीठातील महत्त्वाच्या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. समलिंगी विवाहाप्रकरणी सुरू असलेली सुनावणी उद्या दुपारी 12 वाजता करण्यात यावी. कारण, उद्या सकाळीच महत्त्वाच्या सुनावण्या लिस्टिंग आहेत”, असे सरन्यायाधीश यांनी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितले. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्या.एमआर शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पीएस नरसिम्हा अशा 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर झाली. या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्या. एम.शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे याप्रकरणी उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह आणि शिवसेना पक्षनाव शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाने या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत दाखल याचिकांचा प्रलंबित निकाल एकत्रित लागण्याची शक्यता आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. परंतु, त्या 16 आमदारांनी उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. उपाध्यक्षांना निर्णय घेता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते यावर सर्वोच न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे. या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा हा मूळ प्रश्न त्यात असणार आहे. घटनेच्या दहाव्या परिस्थितीनुसार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply