मुंबई, 3 जून (हिं.स.) केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय आढावा बैठकीतही या जनभावनेचे चित्र दिसले. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह असून निवडणुका कधीही झाल्या तरी काँग्रेस पक्ष तयार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे झालेल्या लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या दोन दिवसीय बैठकीची आज सांगता झाली. या दोन दिवसात ४१ मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. मुंबईतील ६ व चंद्रपूर मतदारसंघाचा आढावा लवकरच स्वतंत्रपणे घेतला जाणार आहे. चर्चा सकारात्मक झाली असून जास्तीत जास्त मतदार संघातून काँग्रेस पक्षाने लढावे असा कार्यकर्त्यांचा सुर आहे. काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद सर्व मतदारसंघात आहे. काँग्रेसला माननारा मोठा वर्ग असून जनतेचा काँग्रेसवरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. आजच्या आढावा बैठकीनंतर लवकरच महाविकास आघाडीची बैठकही होईल व त्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल. आघाडीत सर्व पक्ष चर्चा करुन जागा वाटपावर निर्णय होईल. भाजपाचा पराभव करणे हाच आमचा निर्धार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य, लोकसभा मतदार संघातील प्रमुख नेते, जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply