रत्नागिरी, 2 जून, (हिं. स.) : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी रत्नागिरीच्या सौ. शिल्पाताई धनंजय मराठे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली. या निवडीने रत्नागिरीला प्रदेश स्तरावर मोठी संधी मिळाली आहे.
प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपाध्यक्षपदी सिंधुदुर्गातील प्रज्ञा ढवण आणि सचिवपदी प्रिया शर्मा (कल्याण) आणि शिल्पा मराठे (रत्नागिरी) यांच्या नावांची घोषणा केली. उर्वरित नवीन कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येणार आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी हार्दिक अभिनंदनही केले.
दक्षिण रत्नागिरी भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस शिल्पाताई मराठे अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय आहेत. त्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती झोपडपट्टीसह सर्व मतदारांना देण्याकरिता त्यांनी प्रभागांमध्ये काम केले आहे. हळदीकुंकू समारंभातून प्रभागातील सर्व महिला कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण, करोनाकाळातून वाचलेल्या रुग्णांचे स्वागत, राम मंदिर भूमिपूजनानिमित्त जल्लोष कार्यक्रमांचे आयोजन शिल्पाताईंनी आपापल्या प्रभागांत केले आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने त्यांनी शिक्षिकांचा सन्मानही केला.
ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी भाजपने राज्यभरात केलेल्या आंदोलनात शिल्पाताईंनी भाग घेतला होता. रत्नागिरी शहरात दोन वर्षांपूर्वी रस्त्यांची स्थिती दयनीय झाल्यामुळे भाजपाने स्वतः श्रमदान करून खड्डे भरले होते. त्यात सौ. मराठे यांनी भाग घेतला. आशा सेविकांवर राज्यातील मागील मविआ सरकारने अन्याय केला होता. त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा सौ. मराठे यांनी तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होता. रत्नागिरी एसटी बसस्थानकाच्या अर्धवट कामाविरोधात भाजपाने केलेल्या आंदोलनातही त्यांनी भाग घेतला.
पक्षवाढीसाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply