मुंबई, 1 मे (हिं.स.) : काँग्रेसने उदयपूर शिबिर व रायपूर अधिवेशनात नेतृत्व विकासाच्या मुद्द्यावर मंथन केले आहे. याच उद्देशातून एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी समाजातील नेतृत्व पुढे यावे यासाठी लिडरशिप डेव्हलपमेंट मिशन हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एससी, एसटीच्या आरक्षित जागेवरील प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय ठेवा यातूनच महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत येईल, असे एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसची आढावा व लिडरशिप डेव्हलपमेंट मिशनची बैठक पार पडली. या बैठकीला एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, आशिष दुआ, आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी मंत्री अनिस अहमद यांच्यासह राज्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना के. राजू पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातून लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी राखीव जागांवरील काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे. विधानसभा, लोकसभेत या समाजातून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून गेले तर समाजाच्या विकासासाठी, त्यांच्यासाठी योजना आणण्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. सामाजिक न्याय विषयावर चर्चा होण्यासही मदत होईल व या समाज घटकाला न्याय मिळेल. या आरक्षित जागा जिंकण्यासाठी जिल्हा व ब्लॉक स्तरावर बैठका घेऊन या मिशनचा उद्देश समजावून सांगितला पाहिजे.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र देशाला दिशा देणारे राज्य असून शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराचे हे पुरोगामी राज्य आहे. संविधान संपले तर आदिवासी, ओबीसींचे हक्क राहणार नाहीत. भाजपा आदिवासींना वनवासी म्हणून त्यांचा अपमान करत आहे. भाजपामध्ये आदिवासींचा कोणी वाली नाही, त्यांचा आवाज ऐकला जात नाही तिथे फक्त आरएसएसचेच ऐकले जाते. आदिवासी हे या देशाचे मालक आहेत. एससी, एसटी, ओबीसी समाजातून नवे नेतृत्व उभे राहिले पाहिजे. नवीन नेतृत्व विकसीत करण्यासाठी सुरु केलेले हे काम अत्यंत उपयोगी ठरू शकते. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे, वर्तमान आहे व भविष्यही आहे पण ते दुसऱ्या राजकीय पक्षांकडे नाही.
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, आदिवासी समाज कायम काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. इंदिराजी, राजीवजी, सोनियाजी गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ नंदूरबारमध्येच फोडला. आदिवासींना मालक करण्याचे काम काँग्रेस सरकारने केले आहे. जो ऐतिहासिक अन्याय झालेला आहे तो दूर करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे. परंतु अजूनही ज्या आदिवासींना न्याय मिळालेला नाही त्यासाठी काम करण्याची गरज आहे, त्यासाठी वेळ पडली तर आंदोलन करा. बोगस आदिवासींचा मुद्दाही मोठा आहे, तो सोडवला पाहिजे. के. राजू यांनी नेतृत्व विकास मिशनचे काम हाती घेतले आहे, यातून तरुणांना जास्त संधी मिळाली पाहिजे. आदिवासींमध्ये तरुण व महिलांचा वेगळा सेल केला पाहिजे. ग्रामपंचायत, पंचायत समित्यांमध्ये महिलांना मोठे प्रतिनिधित्व आहे त्यासाठी हे उपयोगाचे आहे.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply