Home राजकारण कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

कुप्रथा या विषयावरील राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि लोकायन सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि बहुद्देशीय संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक लोकसंस्कृतीत प्रदूषण : कुप्रथा’ या विषयात राष्ट्रीय संशोधन परिषद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे दि. 26, 27, 28 मे 2023 या कालावधीत संपन्न झाली. या परिषदेमध्ये मुख्य वक्त्यांचे मार्गदर्शन, अभ्यासकांचे विविध सत्रात शोध निबंध वाचन तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम असे या परिषदेचे स्वरूप होते. या परिषदेमध्ये देशातील विविध प्रांतातून संबंधित विषयातील तज्ज्ञ मान्यवर वक्ते, प्राध्यापक, अभ्यासक आणि संशोधन करणारे विद्यार्थी असे लोक सहभागी झाले होते.


उद्घाटनाप्रसंगी जागतिक स्तराचे दिग्दर्शक डॉ. रवी चतुर्वेदी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष, अभिनेते विजय गोखले, महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे अध्यक्ष, स्नेहल मुजुमदार, आयसीसीआर चे प्रादेशिक पदाधिकारी तसेच संस्कार भारतीचे अनेक सदस्य उपस्थित होते. लोककला आणि लोकसाहित्यात अशा प्रकारचे संशोधन होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. जयंत कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘कुप्रथा’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे संपादन, संशोधन परिषदेची संकल्पना आणि आयोजन परिषदेच्या अध्यक्ष डॉ. मोनिका ठक्कर यांनी केले, तर संयोजन संस्थेचे सचिव योगेश्वर लोळगे यांनी केले.
लोकायन संस्था शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. लोकनाट्य लेखनाची कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन संस्थेमार्फत केले जाते. लोककला आणि लोकसाहित्य संशोधन क्षेत्रात अभ्यासकांना प्रशिक्षण देणे तसेच त्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे यासोबतच प्रयोगात्म लोककलांना प्रोत्साहन देऊन नवीन पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन संस्थेचे सचिव योगेश्वर नामदेव लोळगे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.