मुंबई, १ मे (हिं.स.) : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुलगा अनुज (37) याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुजला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता पुढील उपचारासाठी आज (सोमवारी) एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना मुंबईला आणण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नियोजित कार्यक्रम, दौरे रद्द करून मुंबईत राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
अहमदाबादच्या केडी रुग्णालयाने बुलेटिन जारी करून सांगितले की, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुलगा अनुजला रविवारी (३० एप्रिल) दुपारी २.४५ वाजता केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन अनुजच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. मिश्रा यांनी अहमदाबादमध्ये अनुजची वैद्यकीय तपासणी केली होती. यावेळी पुढील उपचारासाठी मुंबईला दाखल करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्यानंतर आता आज त्याला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आले आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना अनुज हा एकुलता एक मुलगा आहे. अनुज पेशाने इंजिनिअर आहेत. त्याचा अहमदाबादमध्ये अंश कंस्ट्रक्शन व्यवसाय आहे. यात अनुजचा मेव्हणाही पार्टनर असल्याची माहिती आहे. अनुजच्या पत्नीचे नाव देवांशी पटेल असे आहे. मुख्यमंत्री आणि आमदार होण्यापूर्वी भूपेंद्र पटेल हेही याच कंस्ट्रक्शन व्यवसायात होते.
हिंदुस्थान समाचार
Leave a Reply